
विवाहितेवर पती व सासरच्यांकडून कथित अत्याचार
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी): यावल शहरातील एका २९ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या सदस्यांवर शारीरिक, मानसिक तसेच लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरे, नंदोई व इतर चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह भुसावळ येथील एका तरुणाशी झाला होता. विवाहानंतर तिच्या पतीने बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची वारंवार मागणी केली. या मागणीला नकार दिल्यानंतर पतीने तिच्यावर कथितरीत्या अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच, सासऱ्याने व नंदोईनेही शारीरिक छळ केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. याशिवाय, या संपूर्ण प्रकाराची माहिती इतरांना दिल्यास तिच्या वडिलांना व भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले.
हा संपूर्ण प्रकार ११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून यावल पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम