
विवाह नोंदणी विभागाचे महापालिकेच्या १७ मजली इमारतीत होणार स्थलांतर
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना
विवाह नोंदणी विभागाचे महापालिकेच्या १७ मजली इमारतीत होणार स्थलांतर
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी विभागाचे कार्यालय आता लवकरच सतरा मजली प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.सध्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नानीबाई रुग्णालयात कार्यरत असलेला विवाह नोंदणी विभाग आता महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागासोबत स्थलांतरित केला जाणार आहे.
या निर्णयामुळे विवाह नोंदणी विभागातील कर्मचारी जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या कामात सहाय्य करू शकतील, असे आयुक्त ढेरे यांनी नमूद केले. तसेच, जन्म व मृत्यू नोंदणी विभागासाठी आणखी एक संगणक चालक उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे म्हणाले, “विवाह नोंदणी कार्यालयात कामाचा ताण तुलनेने कमी आहे. त्यामुळे या विभागाचे स्थलांतर सतरा मजली इमारतीत केल्यास कर्मचाऱ्यांची जन्म व मृत्यू नोंदणी विभागाला मदत होईल. शिवाय, नानीबाई रुग्णालयात सुरू असलेल्या विवाह नोंदणी कार्यालयात खासगी एजंटांचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता, या स्थलांतरामुळे त्यास आळा बसण्यास मदत होईल.”नागरिकांना होणार फायदा विवाह नोंदणी विभागाचे स्थलांतर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झाल्यास नागरिकांना एकाच ठिकाणी विवाह नोंदणी आणि जन्म-मृत्यू नोंदणीच्या सुविधा उपलब्ध होतील.
यामुळे कार्यक्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांची गैरसोय कमी होईल. तसेच, खासगी एजंटांच्या सुळसुळाटावर नियंत्रण ठेवणेही सोपे होईल.या स्थलांतराची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी आवश्यक तयारी सुरू केली असून, नागरिकांना सुधारित सेवांचा लाभ लवकरच मिळेल, असे सांगण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम