
विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये ‘करिअरच्या वाटा’ विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये ‘करिअरच्या वाटा’ विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर गुणवत्ता विकास विभागामार्फत विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्गदर्शन सत्रासाठी माधवराव गोळवलकर रक्तपेढी, जळगाव येथून अॅड. सौ. संध्या किशोर पाटील उपस्थित होत्या. त्यांनी प्रश्नोत्तर पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत इंजिनिअरिंगमधील विविध शाखांचे महत्त्व समजावून सांगितले. करिअर निवडताना आपले ध्येय निश्चित करणे आणि स्वत:ची आवड जोपासणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखूनच करिअरची निवड करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
याच कार्यक्रमात किशोर सर यांनी विद्यार्थ्यांना VFX या नवीन करिअर क्षेत्राचा परिचय करून दिला. त्यांनी व्हिडिओ इंडस्ट्री, ज्वेलरी डिझाइन, फॅशन डिझाइनिंग, स्टोरी टेलिंग, स्टोरी रायटिंग यांसारख्या विविध आयामांबद्दल उदाहरणांसहित हसत-खेळत माहिती दिली. तसेच, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या सोशल मीडिया प्लेयर्सचे कार्य कसे चालते, हे देखील त्यांनी गमतीशीर पद्धतीने समजावले. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये येणाऱ्या संधी ओळखून त्या दृष्टीने करिअर क्षेत्र कसे निवडावे, याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी, विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून दररोज स्वतःशी संवाद साधावा, स्वतःच्या मानसिकतेची काळजी घ्यावी आणि मित्र-मैत्रिणींशी चांगल्या-वाईट भावना शेअर कराव्यात, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन श्रीराम लोखंडे सर यांनी केले, तर वैशाली पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर आणि समन्वयक श्री. सचिन गायकवाड सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम