
विहिरीत आढळला पिंप्राळ्यातील हरवलेल्या तरुणाचा मृतदेह
विहिरीत आढळला पिंप्राळ्यातील हरवलेल्या तरुणाचा मृतदेह
मुक्ताईनगर तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या पिंप्राळा येथील तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला. या तरुणाचे हात व पाय तारेने बांधलेल्या अवस्थेत असल्याने ही आत्महत्या आहे की घातपात ? याबाबत शंका निर्माण झाली आहे.
कुऱ्हा गावापासून जवळच असलेल्या पिंप्राळा येथील भागवत पुरुषोत्तम पडोळकर (वय २२) हा तरुण १ ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून कुणालाच दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु ते कोठेही आढळले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी गावा शेजारी असलेल्या गट क्र. २०/२
मधील विहिरीत डोकावून पाहिले असता भागवत पडोळकर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही माहिती मिळताच कुऱ्हा पोलीस चौकीचे पो.हे.कॉ. अशोक जाधव, पो.ना. प्रदीप इंगळे, पो.कॉ. सागर सावे, प्रवीण जाधव, अनिल देवरे, श्रावण भिल्ल आदींनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी सुभाष ढवळे, पो.नि. आशिष अडसूळ यांनी ही घटनास्थळ गाठले. तर पो.पा. महादेव झाल्टे, ज्ञानेश्वर झाल्टे, अतुल झाल्टे, सूरज झाल्टे, राजू कांडेलकर यांच्या मदतीने भागवत पडोळकर यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्ताईनगर येथे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, मयत तरुणाचे हात व पाय तारेने बांधलेल्या अवस्थेत असल्याने ही आत्महत्या आहे की घातपात ? याबाबत चर्चांना उधान आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम