
विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द गावातील घटना
अमळनेर : तालुक्यातील लोणखुर्द गावातील समाधान विजय पाटील (वय ३६) या शेतकऱ्याने कर्जाच्या विळख्यात सापडून जीवनाला कंटाळून मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) दुपारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
समाधान पाटील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्जामुळे ते मानसिक तणावाखाली होते. मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून ते परतले नसल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी शोध सुरू केला. दुपारी सुमारास ते गावातील विहिरीत उडी घेतल्याचे समोर आले.
ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले व तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे लोणखुर्द गावात शोककळा पसरली आहे. समाधान पाटील यांच्या मृत्यूमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील राजाराम पाटील करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम