
विहिरीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
विहिरीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
अमळनेर तालुक्यातील कन्हेरे शिवारात घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कन्हेरे शिवारात शेतातील विहिरीत बुडून ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खुशाल सुकदेव भोई (वय ३८, रा. भोई गल्ली, पारोळा, ता. पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हेरे गावातील प्रवीण भावलाल पाटील यांच्या शेत गट क्रमांक १६०/४ मधील विहिरीच्या पाण्यावर तरंगताना एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. याबाबत तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यास कळविण्यात आले.
घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली असता, विहिरीतील पाण्यात आकाशी रंगाचा शर्ट व काळी पँट घातलेला पुरुष मृतावस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या आजूबाजूला विहिरीतील मोटारीला बांधलेली दोरी अडकलेली दिसून आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र, तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे उपचारासाठी नेण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती खुशाल भोई यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे भोई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम