विहिर खोदकाम करताना ब्लास्ट झाल्याने एकाचा मृत्यू
जामनेर तालुक्यातील अंबीलहोळ येथील घटना
जामनेर : तालुक्यातील अंबीलहोळ येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीचे खोदकाम सुरु असताना विहिरीत उतरल्यानंतर ब्लॉसिंग होऊन झालेल्या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील अंबिलहोळ येथील रंगलाल ओंकार चव्हाण यांच्या शेतात सुमारे ३५ फुट विहिर खोदण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राहुल वाघ व भूपेश चव्हाण हे कामगार विहिरीत काम करण्यासाठी उतरले. परंतु, ते काम करत असताना ब्लास्टिंग होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथील राहूल धनराज वाघ (वय ३५) यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी राहुलसह दोघांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच राहुल वाघ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी असलेल्या अंबिलहोळ येथील भूपेश चव्हाण (वय २२) यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम