
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता ‘वॉच’; सीईओंचा व्हिडिओ कॉलद्वारे थेट आढावा उपक्रम
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता ‘वॉच’; सीईओंचा व्हिडिओ कॉलद्वारे थेट आढावा उपक्रम
जळगाव : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. अनेक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियमित हजेरी न लावत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करनवाल यांनी ‘थेट व्हिडिओ कॉल तपासणी’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाअंतर्गत सीईओ करनवाल स्वतः दररोज निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित आहेत का, केंद्रातील सेवा सुरू आहेत का आणि रुग्णांना आवश्यक सुविधा वेळेवर मिळत आहेत का, याचा थेट आढावा घेणार आहेत. त्यामुळे ‘दांडीबहाद्दर’ आणि निष्काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता प्रशासनाची नजर राहणार असून अनुपस्थितीवर तत्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेत शिस्तबद्धता आणि पारदर्शकता निर्माण होणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक अधोरेखित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल, असेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम