
शाळकरी मुलींच्या आत्मसन्मानावर आघात; विवस्त्र तपासणी प्रकरणामुळे संतापाची लाट
शाळकरी मुलींच्या आत्मसन्मानावर आघात; विवस्त्र तपासणी प्रकरणामुळे संतापाची लाट
शहापूर (ठाणे जिल्हा) : शहापूर येथील आर. एस. दमानी विद्यालयात मासिक पाळीच्या संदर्भात झालेल्या अत्यंत धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शाळेतील बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्याने १० ते १२ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आली. या अमानवी कृत्यामुळे संबंधित मुलींच्या आत्मसन्मानावर गहिरा आघात झाला असून, त्यांच्या मानसिकतेवर खोल जखमा झाल्या आहेत.
या प्रकारामुळे सामाजिक अज्ञान आणि संवेदनशीलतेच्या अभावाचे विदारक दर्शन घडले आहे. याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापिका व कर्मचाऱ्यांवर पोक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असली, तरी यामागची मानसिकता आणि व्यवस्थेतील त्रुटी अधिक चिंताजनक आहेत.
या घटनेचा तीव्र निषेध करत निधी फाउंडेशनच्या प्रमुख सौ. वैशाली विसपुते म्हणाल्या की, “मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती लज्जास्पद किंवा अपमानास्पद मानली जाऊ नये. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक जागा असली पाहिजे, मात्र अशा घटनांमुळे शिक्षण संस्थांमधील संवेदनशीलतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.”
निधी फाउंडेशनकडून मासिक पाळीविषयी समाजात जनजागृती, शिक्षण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सौ. विसपुते यांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहेच, पण त्यासोबतच शाळा व्यवस्थापन व शिक्षकांना मासिक पाळी, लैंगिक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांविषयी विशेष प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे.”
शिक्षण क्षेत्रात अशा अमानवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी निधी फाउंडेशनकडून पुढील काळात व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम