
शाळकरी मुलींवर अमानवीय वागणूक; मासिक पाळीविषयी अज्ञानाचा विकृत प्रकार
शहापूर (ठाणे) / प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर. एस. दमानी शाळेत घडलेला प्रकार हा सामाजिक अज्ञान आणि शिक्षण व्यवस्थेतील संवेदनशीलतेच्या अभावाचे भयावह चित्र समोर आणतो. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्यावर १० ते १२ वर्षांच्या शाळकरी मुलींना विवस्त्र करून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या अमानवीय कृत्याने मुलींच्या आत्मसन्मानावर गंभीर आघात झाला आहे.
मुलींच्या मनावर कायमचा ओरखडा
ही घटना केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक पातळीवर मुलींवर अन्याय करणारी आहे. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सन्मानाचे स्थान असायला हवे, मात्र अशा प्रकारांमुळे शिक्षण क्षेत्रातील संवेदनशीलतेच्या मूलभूत कमतरता उघड होत आहेत.
निधी फाउंडेशनकडून तीव्र निषेध
निधी फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. वैशाली विसपुते यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले, “मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, ती लज्जास्पद अथवा अपमानास्पद कधीही नसावी. मुलींवर असे अमानवीय वर्तन होणे दुर्दैवी आहे. आम्ही या विषयावर सातत्याने जनजागृती आणि शिक्षणाच्या माध्यमातून काम करत आहोत.”
केवळ कारवाई पुरेशी नाही; दृष्टीकोनात बदल हवा
या प्रकरणातील मुख्याध्यापिका व कर्मचाऱ्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असली, तरी निधी फाउंडेशनचा आग्रह आहे की, ही बाब केवळ कायदेशीर कारवाईपुरती मर्यादित राहता कामा नये.
“शाळांमध्ये लैंगिक शिक्षण, मासिक पाळीविषयी समज, आणि संवेदनशील दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिक्षक व शाळा प्रशासनाला योग्य प्रशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे,” असेही सौ. विसपुते यांनी सांगितले.
मुलींच्या हक्कांचा आदर होणे आवश्यक
या प्रकरणामुळे समाजाला अंतर्मुख होण्याची गरज आहे. मुलींना त्यांच्या हक्कांचा, सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा अनुभव देणारे वातावरण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम