
शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५चा निकाल जाहीर
शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५चा निकाल जाहीर
जळगाव – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५ चा निकाल दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल परीक्षार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध आहे. तसेच परीक्षार्थी स्वतःचे गुणपत्रक ऑनलाईन प्रिंट स्वरुपात घेऊ शकतात.
जून २०२५ मध्ये ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयांची परीक्षा १८ ते २४ जून २०२५ दरम्यान झाली, तर मराठी व हिंदी ३० व ४० श.प्र.मि. विषयांची परीक्षा ३० जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आली होती.
निकालासोबत विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे व गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीसह ऑनलाईन स्वरुपात संस्थांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संस्थांनी ही प्रमाणपत्रे १०० जीएसएम (GSM) कागदावर रंगीत प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना PDF सॉफ्ट कॉपी देखील द्यावी, जेणेकरून भविष्यात गरजेनुसार प्रमाणपत्राची छपाई करता येईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांच्या आत परीक्षार्थ्यांनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय १०० रुपये व छायाप्रतीसाठी ४०० रुपये या प्रमाणे शुल्क आकारण्यात आले आहे. ही रक्कम दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन भरता येईल. प्राप्त उत्तरपत्रिकेनंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ६०० रुपये शुल्क भरून अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुकांनी ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त सौ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम