
“शाहीर परंपरेमुळेच इतिहास जिवंत राहिला आहे” – आमदार किशोर पाटील
नगरदेवळा येथील राज्यशाहीरी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप
“शाहीर परंपरेमुळेच इतिहास जिवंत राहिला आहे” – आमदार किशोर पाटील
नगरदेवळा येथील राज्यशाहीरी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप
पाचोरा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित राज्यशाहीरी प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे संत सखाराम महाराज संस्थान सांस्कृतिक हॉलमध्ये २७ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या दहा दिवसीय शिबिरात राज्यभरातून आलेल्या ४८ विद्यार्थ्यांनी शाहिरीचे प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील होते. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, तसेच शाहीर विनोद ढगे, शाहीर उत्तम गायकर, शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उद्घाटन केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाहिरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “पराक्रमी इतिहास आणि महापुरुषांचे जीवनकार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य शाहीरांनी डफाच्या गजरात केले आहे. ही लोककला समाजाला जागवते, चेतना देते आणि प्रेरणा देते. आजही ही कला जिवंत ठेवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”
या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, लोकगीते आणि पारंपरिक काव्यरचना सादर करत उपस्थितांची मने जिंकली. रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाहीर विनोद ढगे यांनी खानदेश व महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेचा अभ्यासपूर्ण परिचय दिला. तर शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील यांनी शाहीर घडवण्याचे महत्त्व उलगडून सांगितले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शाहीर जितेंद्र भांडारकर यांनी केले. तर गोकुळ पाटील यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास नगरदेवळा व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम