
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णयासाठी एकत्र या – आ. किशोर दराडे
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णयासाठी एकत्र या – आ. किशोर दराडे
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा
येवला | प्रतिनिधी
एस.एन.डी. इंजिनिअरिंग कॉलेज, बाभुळगाव (ता. येवला) येथे शनिवार, दि. ५ एप्रिल २०२५ रोजी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा पार पडली. या सभेला शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार व मनमानी कारभारावर संताप व्यक्त करत आमदार दराडे यांनी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण खात्याविरोधात लढा उभारण्याचे आवाहन केले. “शिक्षण विभागातील अधिकारी आता इतके मगरूर झाले आहेत की, ते पदाधिकाऱ्यांवर शाब्दिक व मानसिक हल्ले करू लागले आहेत. हे थांबवायचे असेल तर सर्व संघटनांनी एकवटले पाहिजे. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे आमदार दराडे यांनी ठणकावले.
सभेच्या प्रारंभी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख यांनी आमदार किशोर दराडे यांचे स्वागत करत सभेचे प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिक्षण खात्याशी संबंधित विविध समस्यांचा मुद्देसूद आढावा घेतला. प्रमुख समस्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश होता:
शालार्थ आयडी मान्यता व शाळांच्या टप्प्यानुसार (२०,४०,६०,८०,१००%) अनुदान मंजुरी , शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारी अडवणूक , सेवानिवृत्त प्रस्ताव मंजुरीस विलंब , प्रधानमंत्री पोषण आहार योजनेतील अडचणी , शालेय संच मान्यतेसाठी आधार व्हॅलिडेशन संदर्भात सुविधा उपलब्ध करणे , शिक्षकांना अशैक्षणिक कामकाजातून मुक्त करणे , पॅट परीक्षांचे वेळापत्रक व निकाल प्रक्रियेतील समस्या . सीबीएससी धर्तीवरील अभ्यासक्रम लागू करताना ग्रामीण व अतिदुर्गम भागातील अडचणी ,राज्य शासनाकडून शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर निधीची तरतूद यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.
एकत्र लढा देण्याचा निर्धार
या सर्व मुद्द्यांवर शिक्षक आमदार दराडे यांनी सहविचार व्यक्त करत सांगितले की, “राज्यातील सर्व विभागातील शिक्षक आमदार एकत्र येऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” तसेच, शालार्थ आयडी मान्यता बाबतची अडचण सोडवण्यासाठी एप्रिल महिन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांच्या समवेत पुन्हा एक सहविचार सभा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अनिल माळी, दीपक गायकवाड, प्रदीप सांगळे, के.डी. देवढे, बी.डी. घोटेकर, प्राचार्य अनिल खालकर, प्राचार्य आप्पासाहेब जमदाडे, एन.व्ही. शिंदे, सुभाष कानडे, कानिफ मढवई, पोपट बरे, अरुण विभुते, विनायक पाटील, एम.डी. काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या शेवटी कानिफ मढवई यांनी आमदार किशोर दराडे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सभेची सांगता केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम