शिक्षणशास्त्र विभागातर्फे पंधरा दिवसीय आंतरवासिता उपक्रमाचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

शिक्षणशास्त्र विभागातर्फे पंधरा दिवसीय आंतरवासिता उपक्रमाचे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळे अंतर्गत शिक्षणशास्त्र विभागातर्फे पंधरा दिवसीय आंतरवासिता उपक्रमाचे उद्घाटन नूतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालय येथे दि. २३ सप्टेंबर रोजी प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. नूतन मराठा विद्यालयाच्या आवारात असलेल्या शिक्षणशास्त्र विद्यालय येथे दि. २३ सप्टेंबर २०२५ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आंतरवासिता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे म्हणाले की, असे उपक्रम शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास, संघटनशक्ती आणि नेतृत्वगुण जागवतात तसेच यातून त्यांच्यात आत्मशिस्त, जबाबदारीची जाणीव, नेतृत्वगुण, सामूहिक कार्यसंस्कृती आणि समाजाशी एकरूप होण्याची वृत्ती विकसित होणार आहे. आगामी दिवसांमध्ये होणाऱ्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून शिक्षक प्रशिक्षणार्थी अधिक सक्षम, संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले शिक्षक म्हणून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रस्ताविकात शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. स्वाती तायडे यांनी आयोजित उपक्रमा संदर्भात माहिती देत हा उपक्रम म्हणजे शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक प्रकारचे संस्कार शिबिरच आहे. येथे विद्यार्थी- अध्यापन प्रात्यक्षिके सादर करतील, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतील, गटचर्चा, कार्यशाळा व प्रकल्प राबवतील, शिस्त, निवास व आहार व्यवस्था स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळतील, तसेच सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करणारे उपक्रम पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. रणजित पारधे म्हणाले की, एम. एड. द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातील आंतरवासिता उपक्रम हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा, विविध कलागुणांना वाव देणारा आणि सहकार्य-संवाद वाढविणारा उपक्रम आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच व्यक्तिमत्त्व घडविण्यात सहशालेय व आंतरवासिता उपक्रमांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास, संघभावना, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक समृद्धी या सर्व गोष्टींचा अनुभव या उपक्रमांमधून मिळतो.

सदर कार्यक्रम हा आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेच्या संचालक तथा शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा इंदाणी आणि डॉ. संतोष खिराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या प्रसंगी मंचावर प्राध्यापक डॉ. एस. बी. पाटील, प्रा. एम. पी. भदाणे, प्रा. एम. बी. मोरे, प्रा. पी. आय. परदेशी, श्री. संदीप वाघ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा चौधरी तर अमिला गावित यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. एड. द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

————————————————-

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम