
शिरसोलीत मिठाईच्या दुकानावर धाड ; २४ हजारांचा साठा जप्त
शिरसोलीत मिठाईच्या दुकानावर धाड ; २४ हजारांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची सणासुदीपूर्वी कारवाई
जळगाव : जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून मंगळवार, दि. १९ रोजी शिरसोली प्र.न. येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या मिठाई दुकानावर धाड टाकण्यात आली.
या कारवाईत पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाईचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याचे व अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांना अपुरे असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान १५१ किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्याची एकूण किंमत २४,१३० रुपये इतकी असून, नाशवंत असल्यामुळे त्याचा तत्काळ नाश करण्यात आला.
या मोहिमेतून गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोहाडे, योगराज सुर्यवंशी, आकांक्षा खालकर व पद्मजा कढरे यांनी सहभाग नोंदवला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात तयार होणारी मिठाई किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदी करताना दर्जा आणि स्वच्छतेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम