
शिवीगाळ का केली? विचारल्यावर तिघांकडून तरुणाला लाकडी काठीने मारहाण
शिवीगाळ का केली? विचारल्यावर तिघांकडून तरुणाला लाकडी काठीने मारहाण
जळगाव (प्रतिनिधी) – “शिवीगाळ का करता?” असा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या तिघांनी एकाच तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना ११ जुलै रोजी रात्री १० वाजता हरिविठ्ठल नगरातील नवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत कचरु हातांगडे (वय ३२, रा. हरिविठ्ठल नगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते मजुरी करून उपजीविका चालवतात. ११ जुलैच्या रात्री हातांगडे यांच्या घरासमोर बापू कोळी, कपील सुतार आणि युगल सुतार हे जोरजोरात शिवीगाळ करत होते. यावेळी हातांगडे यांनी त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता तिघे चिडून गेले.
संशयितांनी अनंत हातांगडे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर बापू कोळी याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.
जखमी अनंत हातांगडे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बापू रविंद्र कोळी, कपील गणेश सुतार, व युगल सुतार (तीघेही रा. हरिविठ्ठल नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम