“शिव रस्ता मोकळे करणे” अभियानांतर्गत सात रस्ते मोकळे

प्रशासनाचे उल्लेखनीय कार्य

बातमी शेअर करा...

“शिव रस्ता मोकळे करणे” अभियानांतर्गत सात रस्ते मोकळे

प्रशासनाचे उल्लेखनीय कार्य

जळगाव, प्रतिनिधी:
गाव नकाशानुसार अतिक्रमित आणि बंद असलेले शिवार रस्ते, शेतरस्ते, पाणंद आणि पांधण मोकळे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने शनिवारी यावल तालुक्यात विशेष मोहीम राबवून सात बंद रस्ते मोकळे केले.

अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये:
शेतकरी, गावकऱ्यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटवले.
सात बंद शेतरस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
एकूण १० किमी लांबीचे रस्ते मोकळे झाले.
२१० शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठा फायदा.

मोकळे केलेले रस्ते:
बामणोद ते म्हैसवाडी (२ किमी)
सांगवी बुद्रुक ते डोंगरकोठारा (१ किमी)
पिंप्री शेत पाणंद रस्ता (२ किमी)
डांभुर्णी शेत पाणंद रस्ता (१ किमी)
किनगाव ते कासारखेडा (१.५ किमी)
सावखेरसीम ते चुंचाळे शिव रस्ता (१.५ किमी)
यावल शिव रस्ता (१ किमी)

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागत होते, तसेच मालवाहतुकीसाठीही मोठ्या समस्या होत्या. प्रशासनाने अतिक्रमण हटवून हे रस्ते मोकळे केल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

अधिकाऱ्यांचे योगदान:
या विशेष मोहिमेत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी मीना तडवी, मंडळ अधिकारी बबीता चौधरी, तसेच स्थानिक तलाठी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले की, “किरकोळ वादांमुळे हे रस्ते अनेक वर्षांपासून बंद होते. मात्र, शेतकऱ्यांना होणारे नुकसान लक्षात घेता त्यांना विश्वासात घेऊन हे रस्ते मोकळे करण्यात आले. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”

शिव रस्ता मोकळे करणे” अभियानामुळे आता शेतकऱ्यांना शेती, पाणीपुरवठा आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठी सोय झाली आहे. प्रशासनाच्या या उल्लेखनीय कार्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम