
शेडनेट योजनेंतर्गत शेतकऱ्याची सात लाखांची फसवणूक
शेडनेट योजनेंतर्गत शेतकऱ्याची सात लाखांची फसवणूक
अमळनेर प्रतिनिधि | कृषी योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांना आर्थिक जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत असताना पारोळा तालुक्यातील नेरपाट येथील एका शेतकऱ्याची तब्बल सात लाखांची फसवणूक झाल्याचा पाच वर्षांपूर्वीचा प्रकार आता प्रकाशात आला आहे. शेडनेट बसवून देण्याचे आमिष दाखवत कर्ज काढण्यासाठी अंगठे घेऊन रक्कम लाटल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले असून दोन जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरपाट येथील शेतकरी मधुकर गडबड पाटील यांची अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेती आहे. २०२० मध्ये त्यांनी पोखरा योजनेंतर्गत शेडनेटसाठी अर्ज केला होता. त्याचवेळी समाधान पंडित शेलार नावाचा एजंट त्यांच्याशी संपर्कात आला आणि “शेडनेट मंजुरीसोबत कर्जही पटकन मिळवून देतो” असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. शेलार याने पाटील यांना युनियन बँकेत नेऊन काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर अंगठे घेतले.
काही दिवसांनी शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी येथील ओम अॅग्रो कंपनीचे कामगार काही लोखंडी खांब घेऊन पाटील यांच्या शेतात पोहोचले. शेडनेट उभारणीची सुरुवात झाली असे समजत असतानाच काम अचानक थांबले आणि पुढील काहीच घडले नाही. याच दरम्यान युनियन बँकेकडून आलेल्या नोटीसीने पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली . त्यांच्या नावावर ७ लाखांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले होते. व्याजासह ही रक्कम ११ लाखांवर पोहोचली होती.
तपासात लक्षात आले की घेतलेली कर्जरक्कम १८ फेब्रुवारी २०२० रोजी थेट ओम अॅग्रो सर्व्हिसेसच्या खात्यावर वळवण्यात आली होती. कंपनीचे मालक उद्धव कुवर व एजंट समाधान शेलार यांच्या आर्थिक व्यवहारांवरही संशयाची सुई थांबली आहे.
शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे निश्चित होताच पाच वर्षांनंतर या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम