शेतकरी लुटवापसी सभेत रविकांत तुपकरांचा सरकारवर तुफान हल्ला

बातमी शेअर करा...

शेतकरी लुटवापसी सभेत रविकांत तुपकरांचा सरकारवर तुफान हल्ला

 कर्जमुक्ती न दिल्यास शेतकरी नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करतील – रविकांत तुपकर

अकोला (१९ सप्टेंबर) – अकोला शहरातील नामदेव पोहरे सभागृह, मराठा मंडळ, रामदास पेठ येथे किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी लुटवापसी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी काँम्रेड अशोक ढवळे होते. देशभरातील दिग्गज शेतकरी नेते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यामध्ये राकेश टिकैत, प्रकाश पोहरे, विश्वास उटगी, अजीत नवले, पुरूषोत्तम खेडेकर, अजय भगत, कोटेश्वर राव, विजय कृष्णन, प्रशांत गावंडे, पि. साईनाथ आणि बच्चु कडु यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरूषोत्तम गावंडे यांनी केले.

सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भाषण करत सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचे काम पि. साईनाथ यांनी लेखणीच्या माध्यमातून केले, मात्र आपल्या देशातील तरुण पोरं नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात रमलेली आहेत, पण स्वतःच्या बापासाठी, शेतकरी प्रश्नांसाठी लढायला पुढे येत नाहीत. त्यांनी सांगितले की १९७२ मध्ये सोन्याचे भाव आणि कापसाच्या एका क्विंटलचे भाव जवळजवळ सारखे होते, पण आज सोनं आकाशाला भिडलं असतानाही कापूस शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं ठरलं आहे. शेतकरी आणि सोन्याच्या भावातील ही तफावत म्हणजे शेतकऱ्यांवरील प्रचंड अन्याय आहे.

तुपकरांनी सोयाबीन प्रश्नावर भाष्य करताना सरकारला जबाबदार ठरवलं. त्यांनी सांगितले की सोयाबीन प्रक्रिया केल्यानंतर ८२ टक्के सोयापेंड आणि १८ टक्के तेल निघतं. सोयापेंड निर्यात चालू असताना सोयाबीनचे भाव ९ हजारांपर्यंत पोहोचले होते, पण निर्यात बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक असून मुलांची लग्नं होत नाहीत, घरात अडचणी वाढल्या आहेत. याउलट शेतकऱ्यांची पोरं नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करतात पण हक्कांसाठी लढायला तयार नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.

तुपकरांनी अतिवृष्टी नुकसानभरपाईतील दोन हेक्टरची मर्यादा हटवण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की जीएम सोयाबीनवर सरकारची भूमिका दुटप्पी आहे, कारण तेल आयात करायला मोकळीक आहे पण पेरणीस बंदी आहे. हा शेतकऱ्यांचा सरळ अपमान आहे. त्यांनी कठोर शब्दांत सरकारवर टीका करत म्हटले की इंग्रज गेले पण काळे इंग्रज शेतकऱ्यांची लूट करत आहेत.

आपल्या भाषणात त्यांनी तरुणांना आवाहन केले की भगतसिंगाचा आदर्श घेऊन आक्रमक व्हावे, संघटित व्हावे आणि हक्कांसाठी निर्णायक लढा उभारावा. ग्लॅमरच्या कार्यक्रमांना लोक जमतात पण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कोणी येत नाही, ही मानसिकता बदलावी लागेल, अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी तुपकरांनी शेतकरी नेत्यांना एकत्र आणण्याचे काम केल्याबद्दल प्रकाश पोहरे यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की लुटवापसी सभा ही शेतकऱ्यांच्या लढ्याचे एक ऐतिहासिक पाऊल आहे. सभेत उपस्थित सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवर चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

अकोल्यातील ही सभा शेतकरी चळवळीच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून, नेत्यांच्या एकतेतून सरकारविरुद्ध निर्णायक लढ्याची ठिणगी पेटली आहे असे तुपकर यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम