
शेतकऱ्यांना संकटाची सवय लावा’ या पाशा पटेल यांच्या वक्तव्यावरून वादंग; शेतकरी नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया
धाराशिव ;- केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी धाराशिव येथे केलेले “शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी आणि सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा करू नये,” या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय आणि शेतकरी वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेतकरी नेते एस. बी. नाना पाटील यांनी पाशा पटेल यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांच्या वक्तव्याची तुलना ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेशी केली.
‘पाशा पटेल यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरपेक्षा वाईट’ एस. बी. नाना पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले, “पाशाभाईंची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरपेक्षा वाईट आहे. शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी चळवळीत आलेले पाशा पटेल आता सत्ताधारी बनून शेतकऱ्यांना ‘संकटाची सवय लावा’ असा सल्ला देत आहेत.” अस्मानी संकटात शेतकरी पिढ्यानपिढ्या उभा राहिला आहे, पण सरकारकडून निर्माण झालेल्या ‘सुलतानी संकटां’मुळे शेतकरी खऱ्या संकटात असल्याचे पाटील यांनी म्हटले.
‘सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे’ पाशा पटेल यांनी २३ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे जागतिक तापमानवाढीचा संदर्भ देत शेतकऱ्यांनी बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार नुकसानीची मानसिकता ठेवावी असे म्हटले होते. यावर बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटले की, “पाशा पटेल स्वतः बोलत नाहीत, तर त्यांच्या तोंडातून सरकार बोलत आहे.” शेट्टी यांनी कांद्यावरील निर्यातबंदी आणि पामतेलावरील आयात शुल्क कपातीसारख्या सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मंत्री छगन भुजबळ यांनीही पटेल यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, “शेतकऱ्यांच्या घरी अब्जो रुपये पडले आहेत का? त्यांना मदत करावीच लागेल,” असे म्हटले. राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना असे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम