
शेतकऱ्यांसाठी सौर फवारणी पंप योजना; ५० टक्क्यांपर्यंत अनुदान
शेतकऱ्यांसाठी सौर फवारणी पंप योजना; ५० टक्क्यांपर्यंत अनुदान
जळगाव: पिकांवरील कीड आणि रोग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी फवारणी करणे आवश्यक असते. परंतु, यासाठी लागणारे महागडे पंप आणि डिझेल-विजेचा खर्च शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतो. याच समस्येवर तोडगा म्हणून, कृषी विभागाने ‘सौर फवारणी पंप योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे
सौर फवारणी पंप (Solar Spraying Pump Scheme) ही योजना शेतकऱ्यांचा सिंचनाचा खर्च कमी करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या पंपांमुळे डिझेल आणि विजेचा खर्च वाचतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांना पंप पाठीवर न घेता एकाच ठिकाणी ठेवून दिवसभर फवारणी करता येते, ज्यामुळे त्यांचे शारीरिक कष्ट आणि मेहनत कमी होते. ही योजना विशेषतः लहान आणि गरजू शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
- अनुदान: महिला, अल्पभूधारक किंवा अनुसूचित जाती/जमातीतील शेतकऱ्यांना ५०% अनुदान मिळते. इतर पात्र शेतकऱ्यांना ४०% अनुदान देण्यात येते.
योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
पात्रता:
- अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- यापूर्वी महाडीबीटीद्वारे कृषी यांत्रिकीकरण किंवा फवारणी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे:
- फार्मर आयडी
- आधार कार्ड
- ७-१२ उतारा आणि ८-अ उतारा
- जमिनीचा दाखला (लागू असल्यास)
- मोबाइल नंबर आणि पॅन कार्ड
- बँक पासबुक
अर्ज कुठे कराल?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम