
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; चोपडा तालुक्यातील लोणी येथील घटना
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; चोपडा तालुक्यातील लोणी येथील घटना
चोपडा : तालुक्यातील लोणी गावात शनिवारी दुपारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोरक्षनाथ रुपसिंग पाटील (वय ५३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी ५ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर साडीच्या साहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी ६ मे रोजी झालेल्या वादळात त्यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले होते. सुमारे ८ हजार खोडांचे नुकसान झाल्यानंतर ते आर्थिक अडचणी व मानसिक तणावाखाली होते. त्यांनी आपली व्यथा गावकऱ्यांसमोरही व्यक्त केली होती. त्याचबरोबर स्थानिक विकास सोसायटी व इतर काही कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या आर्थिक व मानसिक दबावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम