
शेतकाम करताना सर्पदंश; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
भडगाव तालुक्यातील कोठली येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी)
भडगाव तालुक्यातील कोठली गावात शेतात काम करत असलेल्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मयत तरुणाचे नाव रविंद्र पाटील (वय ४५, रा. कोठली, ता. भडगाव) असे असून, तो आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय करत होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व बहिण असा मोठा परिवार आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात कामासाठी गेले होते. यावेळी अचानक सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी व कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद भडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम