
श्रीराम रथउत्सवातील महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
श्रीराम रथउत्सवातील महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव : शहरातील प्रसिद्ध श्रीराम रथउत्सवाच्या उत्साहात गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला चोरट्या अखेर गुन्हे शोध पथकाच्या सतर्क कारवाईत पकडल्या गेल्या असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे चाळीस हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराजवळ रथ आल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही महिला चोरट्यांनी उपस्थित महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून पलायन केले. या घटनेनंतर पीडित महिलांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने दोन विशेष टीम तयार करून तत्काळ घटनास्थळी रवाना केल्या. या पथकात सफौ/सुनील पाटील, पोहेकॉ/नंदलाल पाटील, पोहेकॉ/विरेंद्र शिंदे, पोहेकॉ/भगवान पाटील, पोहेकॉ/उमेश भांडारकर, पोहेकॉ/सतीश पाटील, पोहेकॉ/योगेश पाटील, पोकॉ/भगवान मोरे, पोकॉ/अमोल ठाकूर, पोकॉ/प्रणय पवार, मपोका/हर्षदा सोनवणे, जयश्री नराटे व मोनाली राजपूत यांनी अत्यंत दक्षतेने तपास मोहीम हाती घेतली.
पथकाने संशयित महिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या ताब्यातून विविध आकारांच्या सोन्याच्या वाट्या व मणी असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये दोन सोन्याच्या वाट्या (१.८७० ग्रॅम), चार सोन्याचे मणी (०.६८० ग्रॅम), तसेच वेगवेगळ्या आकारांच्या तीन सोन्याच्या वाट्या (एकूण वजन ३.८७ ग्रॅम) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३७७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या महिला आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम