
श्रीराम वहनोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ
श्रीराम वहनोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ
शहरात २ नोव्हेंबरला निघणार रथ; वहन मार्गावर पानसुपारीचे आयोजन
जळगावः येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम रथवहनोत्सवाला बुधवार दि. २२ पासून प्रारंभ होत आहे. या अकरा दिवसीय उत्सवात घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती, रासक्रीडा अशी १० वहने शहरातील विविध भागात निघतील. तसेच वहनांच्या मार्गावर पानसुपारी (आमंत्रण) चे कार्यक्रम होणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी श्रीराम रथोत्सव सोहळा होईल.
जलग्रामोत्सव श्रीराम रथोत्सवाला १५२ वर्षे पूर्ण झाली असून, यंदा १५३ वे वर्ष आहे. या रथोत्सवाला बुधवार दि. २२) ते २ नोव्हेंबर असे दहा दिवस वहनोत्सव असणार आहे. २ नोव्हेंबरला श्रीराम रथयात्रा निघणार आहे. उत्सव काळात श्रीराम मंदिरात दररोज पहाटे काकड आरती, पूजा अभिषेक, सातला मंगल आरती, काकड भजन, दुपारी ४ ते सायंकाळी ५ पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ त्यानंतर भजन, संध्यापूजा व आरती होईल. त्यानंतर सायंकाळी सातला श्रीराम मंदिरातून वहन व दिंडी निघेल.
रथचौकातील श्रीराम मंदिर येथून बुधवारी सायंकाळी सातला श्रीराम रथोत्सवाला घोडा या वहनाने सुरूवात होईल. गुरुवारी हत्ती (ऐरावत) हे वहन निघेल. शुक्रवारी वाघाचे वहन, शनिवारी सिंहचे वहन, रविवारी श्री सरस्वती, सोमवार दि. २७ रोजी शेषनाग वहन, मंगळवारी दि. २८ रोजी गजेंद्रमोक्ष, बुधवार दि. २९ रोजी श्री चंद्र, गुरुवार दि. ३० रोजी श्री सूर्यनारायण, दि. ३१ रोजी गरुडराज तर १ नोव्हेंबर रोजी श्री मारुतीराय हे वहन निघेल. तर रविवारी दि.२ रोजी श्रीराम रथोत्सव सोहळा होईल.
वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज संप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबत संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका या असतात.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम