
संत मुक्ताबाई महाविद्यालयात अत्याधुनिक जिमचे उद्घाटन
वरणगाव, बोदवड व भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठीही खुली
मुक्ताईनगर प्रतिनिधी ;- संत मुक्ताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात तालुक्यातील पहिल्यावहिल्या अत्याधुनिक जिमचे उद्घाटन दिनांक २८ मार्च २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
ही जिम विद्याभारती शैक्षणिक मंडळ, अमरावती यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून, मुक्ताईनगरसह वरणगाव, बोदवड व भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठीही खुली राहणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आणि जिराई कंपनीच्या मेकॅनिझमने युक्त अशा या जिममध्ये प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध असतील.
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांच्या दूरदृष्टीतून या जिमची निर्मिती करण्यात आली आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आज अनेक नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या मूलमंत्राचा प्रसार करण्याच्या उद्देशाने नागरिकांना माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र जिमची सोय असून, संपूर्ण जिम वातानुकूलित आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिक सुरक्षित व सुयोग्य वातावरणात व्यायाम करू शकतील.
या उद्घाटन समारंभास संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. काटे, संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्रियंका पवार, क्रीडा समन्वयक प्रा. जे. बी. सिसोदिया, क्रीडा संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र जाधव, प्रा. जे. ए. पाटील, एस. एस. ठाकूर, एस. एस. गायकवाड, प्रदीप खडसे, प्रा. डॉ. के. पी. पाटील, प्रा. डॉ. आर. एन. शेवाळे, प्रा. डॉ. एस. के. माळी, आर. सी. पाटील, जगदीश सिसोदिया, रवी पाटील, भावेश आमोदेकर तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध असलेल्या या जिमचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम