संथारा म्हणजे मृत्युमहोत्सव!

बातमी शेअर करा...

संथारा म्हणजे मृत्युमहोत्सव!

वयोवृद्ध जैन साधवी परमपूज्य प्रियदर्शनाजी महाराज म.सा (वय वर्ष ८६) या पुण्याच्या कोथरूड जैन स्थानकात संथारा व्रत घेऊन आपला मृत्युमहोत्सव साजरा करीत आहेत. त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत. “जैन साधना पद्धती में ध्यान योग” या विषयावर पीएच.डी ची त्यांनी संपादित केली आहे. “नमो सिद्धाय” या विषयावरील त्यांच्या विशेष अभ्यासाबद्दल त्यांना डि.लिट. ने देखील सन्मानित केले गेले आहे. त्यांच्या दर्शनार्थ हजारो जैन भाविक मोठ्या श्रद्धेने तेथे गर्दी करीत आहेत. त्यानिमित्ताने ‘सल्लेखना’ म्हणजे नक्की काय? हा प्रश्न जैनेतर समाजबांधवांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्याचे विवेचन करणारा हा विशेष लेख.
– डॉ. कल्याण गंगवाल (एम. डी. मेडीसीन)

जैन धर्मियांच्या संथारा व्रत अथवा सल्लेखना वर बंदी घालण्याच्या जयपूर उच्च न्यायालयाच्या २०१५च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती व वस्तुतः संथारा ही आत्महत्या नसून तो देहत्याग आहे. मृत्युमोहोत्सव आहे. हे व्रत म्हणजे परमसाधना आहे वैराग्य आहे व तृप्त जीवन जगण्याचे समाधान आहे व शेवटी आपला मृत्यू कसा असावा याबद्दलचे चिंतन आहे.
प्राचीन काळातील अनेक दाखल्यांद्वारे हे व्रत केवळ जैन समाजातच नाही, तर हिंदू, ख्रिश्चन, वैदिक, बौद्ध धर्मातही असल्याचे दिसून येते. या साधनेत टप्प्याटप्प्याने एक-एक गोष्टीचा त्याग करीत शेवटी पाण्याचाही त्याग केला जातो. सरतेशेवटी शांत चित्ताने, समाधानाने या जगाचा निरोप घेतला जातो.
‘तृप्तपणे जगल्यानंतर किंवा असाध्य रोगाने ग्रासल्यामुळे मला आता जगण्याची लालसा नाही आणि मला स्वतःहून मृत्यूलाही आमंत्रण द्यायचे नाही. पण क्रमशः तपश्चर्या करीत करीत देहाचा त्याग करेन,’ अशी ही संकल्पना आहे. दिगंबर पंथामध्ये याला ‘सल्लेखना’ म्हणतात, तर श्वेतांबर पंथामध्ये त्याला ‘संथारा’ असे म्हणतात. मृत्यू हा शाश्वत आहे. प्रत्येकाला तो येणारच आहे.
महाभारतामध्ये भीष्म पितामहांनीसुद्धा अशा प्रकारचे व्रत धारण करूनच बाणांच्या शय्येवरच देहत्याग केला होता. याला हिंदू धर्मामध्ये ‘प्रयोपवेषन’ असे नाव आहे. असे प्रयोपवेषन अनेक संतांनी, ऋषी-मुनींनी केलेले आहे.
अलीकडच्या काळातील उदाहरणे पाहायची झाल्यास, आचार्य विनोबा भावेंनीसुद्धा हे व्रत धारण केले होते. वीर सावरकरांनी सुद्धा अशाच प्रकारे देहत्याग केला होता. ‘कुठल्याही प्रकारचे अन्न ग्रहण करणार नाही आणि औषधोपचार करून घेणार नाही,’ असे ठरवून त्यांनी देहत्याग केला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली होती. ही संकल्पना अत्यंत परमोच्च कोटीची आध्यात्मिक संकल्पना आहे. आपल्या जीवनाचा शेवट मृत्यू हा जीवनाचा कळस म्हणून साजरा केला जातो.
उपवास अथवा आहारत्याग याद्वारे आत्मशुद्धी कशी होत असेल? असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्यासाठी प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, शरीर, मन आणि आत्मा यांची गती भिन्न असली, तरी या तिन्ही बाबी प्रत्येक व्यक्तीत अगदी एकरूप झालेल्या असतात. आहारामुळे इंद्रियांना बळ मिळत असते, चेतना मिळत असते. त्यामुळेच आहारत्यागामुळे सर्व इंद्रिये यांत्रिक होण्यास सुरुवात होते. आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळाल्यानंतर स्वतःचा शोध, आत्मस्थैर्य आणि आत्मचिंतन एकाग्रतेने घडते आणि हेच एकाग्रतेने केलेले ध्यान आत्मशुद्धीकडे नेत असते.
‘तपा’ला नेहमी ‘अग्नी’ची उपमा दिली जाते. अग्नी ‘ऊर्ध्वगमनी’ आहे. तसेच तपाचेही आहे. हिमालयातील योगी वर्षानुवर्षे तप करतानाचे दाखले आपण ऐकतो. त्यामागेही अशीच एकाग्रतेने केलेली साधनाच असते. या साधनेच्या आधारे चयापचय प्रक्रिया कमी करता येते. हे सर्व साधण्यासाठी आयुष्यभर साधना करावी लागते. इंद्रियांवर विजय मिळवून आत्मशुद्धीची वाट चोखाळणारा एखादाच महात्मा, मुनी, श्रावक हे साध्य करू शकतो. तपोसाधनेतून मृत्युमहोत्सवाकडे वाटचाल करणे ही आनंददायी बाब असते.
‘संथारा’बाबत इतिहासात अनेक दाखले आढळतात. चंद्रगुप्त मौर्य यांनी अफगाणिस्तानपर्यंत राज्याचा विस्तार केला होता. पण अंतिम काळी ते जैन मुनी झाले होते. त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता आणि कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील चंद्रगिरी पर्वतावर ‘सल्लेखना’ व्रत धारण करून अंतिम श्वास घेतला. तेथे आज शिलालेख असून, त्यावर उल्लेख आहे की, चंद्रगुप्त मौर्य यांनी आचार्य भद्रबाहू यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लेखना व्रत धारण करून देहत्याग केला.
जैन धर्मातील अत्यंत पवित्र आचार्य समंत भद्र यांनी रत्नकरंडक श्रावकचार या ग्रंथात या सर्व प्रक्रियेचे शास्त्रीय आणि अध्यात्मिक स्वरूपात विश्लेषण केले आहे. त्यानुसार तुमच्यावर कोणी हल्ला केला, दुर्भिक निर्माण झाले, साधुंना भिक्षा मिळेनाशी झाली, वृद्धावस्था निर्माण झाली, असाध्य रोगाने पीडित झालात, तर त्या वेळी कोणताही प्रतिकार न करता धर्म कार्यासाठी देहापासून विमोचन करण्याची प्रक्रिया म्हणजेच सल्लेखना – संथारा व्रत होय.
भगवान महावीर यांच्या नंतर ७०० वर्षांनी इसवी सन दुसऱ्या शतकात झालेल्या आचार्य उमा स्वामी यांनी लिहिलेल्या तत्वार्थ सूत्र याचे संपूर्ण विवेचन आहे. मारणांन्तिकी सल्लेखना जोषीता. मृत्यू समीप आल्यास जागृत अवस्थेत सल्लेखना हा संथारा व्रताचा आश्रय घ्यायला हवा.
या अध्यात्मिक प्रक्रियेमध्ये आत्म्याच्या आश्रयाने कषायांना, विकारांना कमी करून अनशनादी तपाच्या साहाय्याने धर्माच्या रक्षणासाठी मरणाचा अवलंब करणे म्हणजे ‘सल्लेखना’ होय.
सल्लेखना धारण करण्याचा अधिकार प्रत्येक साधू-साध्वी, श्रावक-श्राविका यांना असतो. सल्लेखना धारण करून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य यांची प्राप्ती करूनच देहत्याग केला जातो. शरीर आणि आत्मा चेतनाशक्ती ही दोन्ही भिन्न आहेत. याचे ज्ञान म्हणजेच जैनांचे ‘भेदविज्ञान’! त्यामुळेच या व्रताची व्यापकता, त्यामागचा भावार्थ जाणून घेणे आवश्यक आहे.
संत तुकारामांनी देखील म्हटले आहे माझे मरण म्या डोळा पाहिले सोहळा तो झाला अनुपम्य. म्हणजे माझे मरण मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे आणि तो सोहळा अनुपम्य होता असे आपल्या निर्वाण महोत्सवाचे वर्णन संत तुकारामांनी केले आहे.
स्वतः माझ्या वडिलांनी अश्याच प्रकारचे व्रत धरण केले होते. ज्याला नियम सल्लेखना असे म्हणतात. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी १२ वर्षांचे व्रत घेतले. ते पूर्ण झाल्यावर त्यांनी सल्लेखना व्रत घेऊन वयाच्या ९२व्या वर्षी अत्यंत जागृत अवस्थेत स्वतः ठरवलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर देहत्याग केला. नामोकार मंत्राचा जप करीत ‘ओम नमो सिद्धेभ्य’ असे म्हणत त्यांनी डोळे बंद केले. एक डॉक्टर या नात्याने मृत्यू किती सुंदर असू शकतो याची अनुभूती मला आली.
मी स्वतः ८१ वर्षांचा असून कोणत्याही असाध्य रोगाने मला ग्रासले तर हॉस्पिटल मध्ये न जाता मी सल्लेखना व्रत घेणार आहे असे स्पष्टपणे नमूद मी माझ्या मृत्यपत्रात केले आहे.

– डॉ. कल्याण गंगवाल (संस्थापक, सर्वजीव मंगल प्रतिष्ठान)
संपर्क – 9923017343
संकलन – संजय कोटेचा बोदवड

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम