
संस्कृती संवर्धन उपक्रमांतर्गत विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे ‘कानबाई उत्सव’ साजरा; खानदेशच्या वैभवशाली लोकपरंपरेला उजाळा
संस्कृती संवर्धन उपक्रमांतर्गत विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे ‘कानबाई उत्सव’ साजरा; खानदेशच्या वैभवशाली लोकपरंपरेला उजाळा
जळगाव, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूल व प्राथमिक-उच्च प्राथमिक शाळेमध्ये संस्कृती संवर्धन उपक्रमांतर्गत खानदेशातील वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आणि लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला कानबाई उत्सव विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या ‘संस्कृती संवर्धन व लोककला संवर्धन’ उपक्रमाची ही सुरुवात होती. खानदेशातील पारंपरिक उत्सव, लोककला, रूढी-परंपरा यांची नव्या पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात कानबाई मातेची विधीवत स्थापना करून तिच्या इतिहासाचे, सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमीचे तसेच लोकसांस्कृतिक महत्त्वाचे विवेचन करण्यात आले. या निमित्ताने पारंपरिक खेळ, नृत्य, गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. कानबाईच्या पारंपरिक लोकगीतात विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व उपस्थितांनीही उत्साहात ठेका धरला.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडवले. या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून ‘कानबाई उत्सव’ संदर्भातील माहिती पुस्तिका तयार केली जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षकवृंद यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी हा उत्सव मनमुराद आनंदात साजरा केला असून, शाळेच्या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम