
समान काम, समान वेतन’च्या मागणीसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
‘समान काम, समान वेतन’च्या मागणीसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
मुंबई | १ जुलै २०२५ – राज्यातील १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून (मंगळवार) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वावर आधारित कुशल दर्जाचे वेतन, भत्ते, जादा कामाचा मोबदला तसेच कायदेशीर रजा व इतर सवलती मिळाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
या चालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असूनही त्यांच्या मागण्यांकडे शासन आणि पुरवठादार कंपन्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चालक संघटनेने केला आहे. याआधी १३ मे २०२५ रोजी मुंबईत यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासने दिली होती, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी टीका युनियनने केली.
चालकांनी १५ जूनपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतरही ३० जूनपर्यंत कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर चालक संघटनेने आजपासून बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून आपत्कालीन आरोग्यसेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासन आणि संबंधित पुरवठादार कंपन्यांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम