
“समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोरगाव बु ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम”
“समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोरगाव बु ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम”
सांडपाणी निचरा व्यवस्थेमुळे गाव झाले स्वच्छतेच्या दिशेने आदर्श
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील मोरगाव बु या ग्रामपंचायतीने सांडपाणी निचऱ्याची सुयोग्य व्यवस्था निर्माण करून जिल्ह्यात एक आगळा-वेगळा आणि आदर्श निर्माण केला आहे.
गावातील सर्व रस्त्यांवरून सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारींचे सुसज्ज जाळे तयार करण्यात आले असून त्यामुळे गावातील रस्त्यांवर सांडपाणी साचण्याचे प्रमाण पूर्णपणे शून्य झाले आहे. गाव स्वच्छ, आरोग्यदायी आणि राहणीस योग्य बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपाययोजना आदर्शवत ठरल्या आहेत.
या उपक्रमाची माहिती इतर गावातील सरपंच व ग्रामसेवकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी मोरगाव येथे एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी भूषविले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक गावात सांडपाणी निचऱ्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करणे ही स्वच्छतेकडे जाणारी पहिली पायरी आहे. ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे नवकल्पक व स्वयंपूर्ण उपक्रम राबविल्यास जिल्हा संपूर्ण स्वच्छ व आरोग्यदायी बनेल.”
या वेळी रावेर तालुक्याचे गटविकास अधिकारी किशोर मेढे, मोरगाव बु ग्रामपंचायतीचे सरपंच जनार्दन पाटील, तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी , रावेर तालुक्यात 42 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत त्यापैकी केऱ्हाळे येथील वनराई बंधाऱ्याचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम