
साकळीत संतप्त नागरिकांची विज वितरण कार्यालयावर धडक
साकळीत संतप्त नागरिकांची विज वितरण कार्यालयावर धडक
सहाय्यक अभियंता अनुपस्थित ;फोनवरूनच स्मार्ट मीटर बसविणे थांबविले!
मनवेल ता.यावल ः– साकळी गावात विज वितरण कार्यालयाकडून नागरिकांच्या तीव्र विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ग्राहकांकडे जबरदस्तीने स्मार्ट विज मीटर बसवण्याचे काम करण्यात येत होते.मात्र या मोहिमेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. जबरदस्तीच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोध दर्शवण्यासाठी गावातील असंख्य संतप्त नागरिकांनी दि.३० रोजी साकळी येथील वीज वितरण कार्यालयात धडक दिली.व जबरदस्तीने स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.यावेळी कार्यालयातील कर्मचारी हजर होते त्यांच्याकडे सदर स्मार्ट वीज मीटरच्या बाबत तक्रारी मांडल्या.मात्र या ठिकाणी सहाय्यक अभियंता यादव हे कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते फैसलखान यांनी संपर्क साधून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविणे हे चुकीचे आहे.ग्राहकांची नाराजी आहे.तेव्हा आपल्याकडे याबाबत शासनाचे परिपत्रक (जीआर) आहे का ? तो आम्हाला दाखवा व तेव्हाच मीटर बसवा.असा प्रश्न उपस्थित केला.व गावात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहिम थांबवण्याची विनंती केली.
सामाजिक कार्यकर्ते फैसलखान यांची सहाय्यक अभियंता यादव यांच्याशी फोन द्वारे झालेल्या चर्चेत नागरिकांच्या संतप्त व रोषाची भावना लक्षात घेऊन अभियंता यादव यांनी स्मार्ट मीटर बसविणे तात्पुरते थांबविण्याचे आदेश फोनवरूनच दिले.अभियंता यादव यांनी सांगितले की,सोमवार दि.१ रोजी रोजी स्मार्ट वीज मीटर बसवण्याबाबत नागरिक ग्राहकांची एक बैठक घेऊ.तोपर्यंत स्मार्ट मीटर बसविणे थांबवा.असे कर्मचाऱ्यांना सुचित केले.
*संतप्त नागरिकांचा रोष – असंख्य विज ग्राहक नागरिक वीज वितरण च्या कार्यालयात पोहोचले असता. सहाय्यक अभियंता यादव हे कार्यालयात हजर न राहणे,जनतेला ताटकळत ठेवणे.स्मार्ट मीटर बसवणे बाबत अनभिज्ञ ठेवणे? या सर्व प्रकारामुळे नागरिकांमधील रोष आणखीनच वाढल्याचे चित्र यावेळी दिसून आले. नागरिक–अभियंता यांच्या बैठकीत स्मार्ट मीटर लादण्याच्या निर्णयावर काय अंतिम भूमिका घेतली जाणार?याकडे नागरिक-वीज ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
स्मार्ट मीटर लादण्याची सक्ती कोणी केली?सरकारने सक्ती नाही म्हणत असताना विजवितरण विभागाची जबरदस्ती का?
ग्राहकांचा वापर, बिल, दंड, कपात यावर नंतर काय परिणाम होणार?स्मार्ट मीटरमुळे वाढणाऱ्या बिलांचा जबाबदार कोण? मोठा आर्थिक भूदंड सर्वसामान्य नागरिक कसे काय सहन करणार? असे प्रश्न संतप्त नागरिक यावेळी उपस्थित करीत होते.
तरी संबंधित वीज वितरणच्या वरिष्ठ प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी वीज ग्राहकांच्या या समस्याकडे नुसती बघ्याची भूमिका न घेता गांभीर्याने लक्ष देऊन यातून योग्य असा कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम