
सातगाव डोंगरीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
सातगाव डोंगरीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
कुटुंबाने केली मदतीची मागणी
वडगाव कडे (ता. पाचोरा) : सातगाव डोंगरीतील समाधान महावु महाले (वय ३५) या शेतकऱ्याने कर्जाच्या भारामुळे स्वतःच्या शेतात विष प्राशन करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
खरिपाच्या हंगामात अपेक्षित उत्पन्न न झाल्याने आणि सुमारे साडेतीन लाख रुपयांचे बँक कर्ज कसे फेडावे, या चिंतेत समाधान महाले गेले होते. चार दिवसांपासून ते मानसिक तणावात होते आणि अखेर त्यांनी शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
पत्नीने घरी न आल्याने शेतात चौकशीसाठी काही जणांना पाठवले असता, महाले गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, रात्री दोन वाजता त्यांचे निधन झाले.
समाधान महाले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून शासनाने तातडीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी आणि बँकेचे कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम