
सात दिवशीय डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरुवात
सात दिवशीय डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरुवात
जळगाव, – जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी.यू.एन. रायसोनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास आजपासून बी.यू.एन. रायसोनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. या शिबिराचे आयोजन दिनांक १९ जुलै ते २५ जुलै २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी यांनी मैदान पूजन करून व श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, नाशिक विभागीय शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, बी.यू.एन. रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचा खेळाडू विनायक सपकाळे याची जपान येथे होणाऱ्या वर्ल्ड डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बालविश्व विद्यालयाच्या अध्यक्षा सौ. भारती चौधरी, संचालक सौरभ चौधरी, निस्वार्थ जनसेवा फाऊंडेशनचे सचिव धीरज जावळे, जिल्हा खेलो मास्टर्स असोसिएशनचे सहसचिव जितेंद्र फिरके, राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू चैताली पाटील यांचीही उपस्थिती होती.
शिबिराचे सूत्रसंचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन धनराज भोई यांनी मानले. शिबिरात मार्गदर्शक म्हणून योगेश सोनवणे व आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायक सपकाळे हे प्रशिक्षण देत आहेत.
दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत होणाऱ्या या प्रशिक्षणात विविध शाळा आणि महाविद्यालयांतील एकूण १२२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. डॉजबॉल खेळाची माहिती, तांत्रिक बाबी, डावपेच, कौशल्य, नियम, साहित्य, मैदान रचना, पंचकार्य, पूरक खेळ, व्यायाम प्रकार व अडचणी यावर मार्गदर्शन केले जात आहे. इच्छुक क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक, डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव व बी.यू.एन. रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम