
सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या आकांक्षाचा झंझावात
सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या आकांक्षाचा झंझावात
सुवर्णासह चार पदकांची ऐतिहासिक कमाई
जळगाव, (प्रतिनिधी): ५४ व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या कन्येने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. आकांक्षा म्हेत्रे हिने या प्रतिष्ठित स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि तीन कांस्य पदकांची कमाई करत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने १९ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्तराखंडमधील रूद्रपूर येथील शिवालिका वेलोड्रमवर या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून १४, १६, १८ व सिनिअर गटांतील ६०० हून अधिक सायकलपट्टू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षा म्हेत्रे हिने टीम परस्यूट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या दिवशी झालेल्या टीम स्प्रिंट प्रकारात तिने कांस्यपदक मिळवले. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या दिवशी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत वैयक्तिक स्प्रिंट व वैयक्तिक टाईम ट्रायल या दोन्ही स्पर्धांमध्ये कांस्यपदकांची कमाई करत एकूण चार पदके आपल्या नावावर केली.
सध्या आकांक्षा पुणे येथील बालेवाडी सायकलिंग ट्रॅकवर आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी कठोर सराव करत आहे. तिच्या या चमकदार कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या ज्युनिअर मुला-मुलींच्या संघाला रनरअप ट्रॉफीने गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक दिपाली शिरधनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आकांक्षा म्हेत्रे व महाराष्ट्र ज्युनिअर सायकलिंग संघाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम रोठे, सचिव संजय साठे, तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्य दिपाली पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम