सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर; महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक

बातमी शेअर करा...

सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर; महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक

सावदा प्रतिनिधी

सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून शहरातील नागरिक आणि इच्छुक उमेदवार आता आपले नावे आणि प्रभागानिहाय मतदारांची माहिती पाहत आहेत.

या वेळेस नगरपालिकेची मतदार यादी विधानसभा मतदार याद्यांच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, २०१८ मध्ये १८,००० मतदार असताना यावेळी ही संख्या वाढून २०,७५६ झाली आहे. यामध्ये महिला मतदार १०,४२९ असून पुरुषांपेक्षा १०२ अधिक आहेत, त्यामुळे सावदा शहरात महिला मतदार आघाडीवर असल्याचे दिसून येते.

यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीतील महिला वर्गासाठी राखीव आहे, तसेच नगरसेवक पदासाठीही दहा महिला उमेदवार सभागृहात स्थान मिळवणार आहेत. त्यामुळे एकूण ११ महिला सभासद या नगरपालिकेत कार्यरत राहणार आहेत.

सावदा शहरातील १० प्रभागांमध्ये मतदार संख्या खालीलप्रमाणे आहे:

प्रभाग पुरुष महिला एकूण मतदार

1 932 906 1838
2 971 949 1920
3 1311 1321 2632
4 1071 1078 2149
5 1179 1164 2343
6 1022 1040 2069
7 1117 1145 2262
8 996 970 1966
9 846 998 1754
10 882 948 1830

या प्रभागांपैकी प्रभाग 3 सर्वात मोठा असून २,६३२ मतदार आहेत, तर प्रभाग 9 सर्वात लहान असून १,७५४ मतदार आहेत.

राजकीय परिस्थितीकडे पाहता, सावद्यात सध्या रा.कॉ. (दादा गट) तर्फे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आघाडीवर असून त्यांनी जवळपास सर्व प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या सुभद्राबाई बडगे यांची उमेदवारी जवळपास ठोस मानली जात आहे.

दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्याप अंतिम उमेदवार जाहीर केलेले नाहीत. नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे आणि समाजसेवक गजानन ठोसरे यांच्या पत्नी सुनीता ठोसरे प्रबळ दावेदार आहेत. भाजपकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या सल्ल्यानुसार अंतिम यादी जाहीर होणार आहे.

त्याचप्रमाणे, एकेकाळी भाजपात असलेले आणि सध्या रा.कॉ. (शरदचंद्र गट) सोबत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक कोणास पाठिंबा देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनाही नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे सावदा शहरात निवडणूक रंगतदार आणि तापलेल्या राजकारणाच्या वातावरणात पार पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम