सावदा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा गट स्थापन

बातमी शेअर करा...

सावदा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा गट स्थापन
राजेश वानखेडे गटनेते, विजया जावळे प्रदोतपदी; जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मान्यता

सावदा प्रतिनिधी : सावदा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाची राजकीय घडामोड घडवत अधिकृत नगरसेवक गट स्थापन केला आहे. दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश गजाननराव वानखेडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी, तर नगरसेविका विजया कुशल जावळे यांची प्रदोतपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

सावदा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी सर्वसंमतीने हा निर्णय घेतल्याने पक्षातील एकजूट ठळकपणे दिसून आली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राजेश वानखेडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष एकदिलाने काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. शहरातील जलपुरवठा, रस्ते विकास, कचरा व्यवस्थापन व पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रदोतपदी नियुक्त झालेल्या विजया जावळे यांनी महिलांच्या प्रश्नांसह स्वच्छता, नागरी सुविधा आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या गट स्थापन प्रक्रियेदरम्यान नगरसेवक रेखा राजेश वानखेडे, सिमरन राजेश वानखेडे, सीमा वेळू लोखंडे, विशाल प्रेमचंद तायडे तसेच हेमंत महाजन उपस्थित होते. सर्व नगरसेवकांनी गटाच्या ऐक्याला पाठिंबा देत पक्ष मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या गट स्थापनेचे पक्ष कार्यकर्ते व समर्थकांनी स्वागत करत नवनियुक्त गटनेते राजेश वानखेडे व प्रदोत विजया जावळे यांचे अभिनंदन केले. या घडामोडीमुळे सावदा नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक संघटित, प्रभावी आणि लोकहितकेंद्रित राहील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम