सावदा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक

बातमी शेअर करा...

सावदा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक

दुर्गोत्सव मंडळांना मार्गदर्शन, नागरिकांच्या सूचनांना प्रतिसाद

सावदा (प्रतिनिधी) : सावदा पोलीस स्टेशन येथे दिनांक १९ रोजी सकाळी १० वाजता आगामी दुर्गोत्सव तसेच इतर सण-उत्सव पार पाडण्यासाठी शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले तर सावदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण ढवळे यांनी दुर्गोत्सव मंडळांना सूचनाही दिल्या. विशेषत: नवरात्रीत महिलांची मोठी गर्दी होत असल्याने मंडळांनी योग्य व्यवस्था करावी, गर्दीच्या ठिकाणी महिलांनी दागदागिने किंवा मौल्यवान वस्तू घेऊन येऊ नयेत, गरबा खेळताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच स्पीकरचा आवाज मर्यादित ठेवावा, विसर्जन मिरवणुकीत वाद्यांचा आवाज मर्यादित असावा आणि वेळेचे बंधन पाळावे असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनीही बैठकीत अनेक मुद्दे मांडले. माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजपा सावदा मंडळ सरचिटणीस महेश अकोले व पत्रकार दीपक श्रावगे यांनी गणपती विसर्जनावेळी सावदा-हतनूर धरण रस्ता खराब अवस्थेत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले, त्यामुळे आता दुर्गोत्सवापूर्वी हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा अशी मागणी केली. तसेच सर्वच उत्सव दारू सेवनाशी जोडून बदनाम करू नयेत, केवळ काही व्यक्तींच्या कृतीमुळे संपूर्ण उत्सवावर कलंक लागू नये, अशी भावना माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.

भाजपा मंडळाचे उपाध्यक्ष संतोष परदेशी यांनी वर्षभर शहरात ध्वनीप्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगून त्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. माजी उपनगराध्यक्षा सौ. नंदाबाई लोखंडे यांनी विसर्जनावेळी दारू दुकाने बंद असतानाही विक्री सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

स.पो.नि. विशाल पाटील यांनी नागरिकांच्या सूचनांना प्रतिसाद देताना, गणेशोत्सवावेळीच सावदा-हतनूर धरण रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिल्याचे सांगितले व पुन्हा पत्र देण्यात येईल असे स्पष्ट केले.

या बैठकीस सावदा शहर व परिसरातील नगरसेवक, पदाधिकारी, पोलीस पाटील, दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम