सावदा रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा...

सावदा रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन

सावदा प्रतिनिधी भारतीय रेल्वेद्वारे राबविण्यात येत असलेल्या “विशेष अभियान 5.0” अंतर्गत आज भुसावळ विभागातील सावदा रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्थानकावर करण्यात आलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा घेणे, प्रवासी सुविधा आणि स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून सूचना प्राप्त करणे हा होता, जेणेकरून भविष्यात रेल्वे सेवा अधिक सुसज्ज बनवता येतील.

कार्यक्रमादरम्यान भुसावळ विभागातील वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) श्री पंचम सिंग जाटव यांनी प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि सुधारित सुविधांवर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की, सावदा रेल्वे स्थानकाचा ‘अमृत स्टेशन योजने’ अंतर्गत आधुनिक विकास करण्यात आला असून, येथे नवीन प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, नव्याने उभारलेले प्लॅटफॉर्म शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सर्कुलेटिंग एरिया आकर्षक सौंदर्यीकरण, कोच मार्गदर्शन प्रणाली, दिशादर्शक फलक अशा आधुनिक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

“अमृत संवाद” कार्यक्रमात प्रवासी व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांनी त्यांच्या अडचणी मांडल्या तसेच काही उपयुक्त सूचना दिल्या. वरिष्ठ विभागीय अभियंता यांनी प्रवाशांना आश्वासन दिले की, मिळालेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल आणि त्या टप्प्याटप्प्याने अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

या अमृत संवाद कार्यक्रमात रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) श्री पंचम सिंग जाटव, वरिष्ठ विभागीय अभियंता (गतिशक्ति) श्री डी के शुक्ला, सहायक वाणिज्य व्यवस्थापक श्री पी के सिंग, स्टेशन अधीक्षक, पर्यवेक्षक, अन्य कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी उत्स्फूर्त संवाद साधून रेल्वे सेवा अधिक प्रवासी-मैत्रीपूर्ण आणि सुलभ बनवण्यासाठी मौल्यवान सूचना दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम