सावदा शहरातील पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

बातमी शेअर करा...

सावदा शहरातील पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

सावदा (प्रतिनिधी) : सावदा शहराला हतनूर धरणाच्या बॅंकवॉटरमधून होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाला आहे. कारण, शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी पाईपलाईन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन ठिकाणी फुटली असून, त्यात एक भाग रेल्वे बोगद्याच्या खाली असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत.

ही पाईपलाईन सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झाली होती. मात्र, आता ती अत्यंत जीर्णावस्थेत असून वारंवार गळती होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, ‘अमृत योजना’अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. मांगलवाडी ते सावदा स्टेशन दरम्यान नवीन पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी ती पावसाळ्यापूर्वीच कार्यान्वित केली गेली नाही. त्यामुळे जुन्या लाईनवरच अवलंबून राहावे लागत असल्याने सध्याची स्थिती उद्भवली आहे.

सुमारे पाच ते सात दिवस पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. नागरीकांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली असतानाही पालिकेकडून योग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

“पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल,” अशी माहिती मुख्याधिकारी भूषण वर्मा, पाणीपुरवठा अभियंता पाजक्ता जैन आणि कर्मचारी अविनाश पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, “नागरिकांनी संयम बाळगावा, तोपर्यंत गाव हाळ, रविवारी पेठेतील कूपनलिका, थोरगव्हाण रोडवरील हाळ याठिकाणी पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम