
सुदृढ बालकासाठी योग्य वयातील मातृत्व – काळाची गरज
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग मध्ये आयोजित व्याखानामध्ये डॉ. रुपाली बेंडाळे यांचे प्रतिपादन
सुदृढ बालकासाठी योग्य वयातील मातृत्व – काळाची गरज
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग मध्ये आयोजित व्याखानामध्ये डॉ. रुपाली बेंडाळे यांचे प्रतिपादन
जळगाव ;- निरोगी माता आणि सुदृढ बालक ही आजच्या काळाची गरज आहे. आई निरोगी असेल तरच सुदृढ बालक जन्माला येवू शकते. त्यासाठी योग्य वयात मातृत्व धारण करणे, बाळाला जन्मास घालणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच भविष्यामध्ये उत्तम संतती निर्माण होवू शकते. असे प्रतिपादन डॉ. रुपाली बेंडाळे यांनी मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा आयोजित व्याख्यानामध्ये केले.
जागतिक आरोग्य दिन प्रतिवर्षी ७ एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने यावर्षी “सशक्त सुरुवात आशादायी भविष्य” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवली आहे. या संकल्पनेनुसार मातृत्व आणि नवजात बाळांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे तसेच महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. रुपाली बेंडाळे यांचे ‘निरोगी माता आणि सुदृढ बालक’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.
आज युवक युवती उत्तम करिअरसाठी प्रयत्न करीत असताना आपले आई वडील होण्याचे वय निघून गेल्यावर बाळ जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यावेळी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्याग्रस्त काळात बाळ जन्माला आले तरी ते पूर्णत: स्वस्थ असेलच याची निश्चिती नाही. त्यामुळे उत्तम मातृत्व आणि सुदृढ बालकासाठी प्रकृतीच्या नियमानुसार मुलीच्या वयाच्या २२ ते २६ वर्ष हा कालावधी उत्तम मानला जातो. असे विचार डॉ. रुपाली बेंडाळे यांनी यावेळी व्यक्त केले. गर्भधारणेतील समस्या, बालकाच्या विकासाचे टप्पे, गर्भवती महिलेचा आहार, बाल संगोपन, बालकांसाठी स्तनपान आणि आहाराचे महत्व अशा विविध विषयांवर उपस्थित महिलांना त्यांनी आपल्या व्याख्यानातून माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर सोहम चे संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थित होते. प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ, प्रा. श्रद्धा व्यास यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम