सुन्नी मुस्लिम बांधवांचा बैठकीत निर्णय ; ईद-ए-मिलादची मिरवणूक ८ सप्टेंबरला

बातमी शेअर करा...

सुन्नी मुस्लिम बांधवांचा बैठकीत निर्णय ; ईद-ए-मिलादची मिरवणूक ८ सप्टेंबरला

पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव : धार्मिक सौहार्द आणि बंधुभाव जपत जळगावच्या सुन्नी मुस्लिम समाजाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद उन नबी हे दोन्ही सण एकाच काळात आल्याने कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ५ सप्टेंबर रोजी होणारी ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलून ८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा ५ सप्टेंबरला मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद साजरा करणार असून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. दोन्ही मोठ्या मिरवणुका एकाच वेळी निघाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने मुस्लिम समाजाने परस्पर सहमतीने मिरवणूक पुढे ढकलण्याचे ठरविले.

मरकझी सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मरकझी जुलूस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन देत याबाबत अधिकृत माहिती दिली. या वेळी कमिटीचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, जावेद इमाम, सय्यद उमर, अमान बिलाल, शेख रईस, शेख शफी, अयान अलीम आदी सदस्य उपस्थित होते.

या सौहार्दपूर्ण निर्णयामुळे गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यास मदत होणार असून, दोन्ही समाजांत एकतेचा आणि भाईचाऱ्याचा संदेश दृढ झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचे स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम