सुप्रीम कॉलनीत घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

बातमी शेअर करा...

सुप्रीम कॉलनीत घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी, पोलीस कॉलनी परिसरात बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर आले आहे.

शरिफ मुराद खाटीक (वय ५२, व्यवसाय मजुरी, रा. सुप्रीम कॉलनी, पोलीस कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान फिर्यादींचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेज कपाट फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले.

चोरट्यांनी चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे हेरिंग (किंमत २४ हजार रुपये), एक ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे पुडके (६ हजार रुपये), अर्धा ग्रॅम वजनाची लहान मुलाची सोन्याची अंगठी (३ हजार रुपये), अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नाकातील फुली (३ हजार रुपये), सुमारे सहा भार वजनाचे लहान मुलाचे चांदीचे हातातील कडे (११ हजार रुपये), सहा ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील पैजण (१०० रुपये) तसेच दहा ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या अंगठ्या (१ हजार ४०० रुपये) असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

हा प्रकार दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०५/२०२५ अन्वये भादंवि कलम ३०५(अ), ३३१(४) प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण चौधरी करीत असून, सध्या कोणत्याही संशयिताची अटक झालेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच इतर तांत्रिक माध्यमांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम