
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी; ५३ हजारांचा ऐवज लंपास
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी; ५३ हजारांचा ऐवज लंपास
जळगाव शहरातील यश लॉन परिसरातील घटना
जळगाव : शहरातील यश लॉन परिसरात राहणाऱ्या महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपालसिंह भिंमसिंह राजपूत (वय ६८) हे पत्नीसमवेत यश लॉन परिसरात राहतात. १० एप्रिल रोजी ते उन्हाळी सुट्टीसाठी सोलापूर येथे मुलीकडे गेले होते. दरम्यान, २५ एप्रिल रोजी त्यांच्या शेजाऱ्यांनी घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहून त्यांना फोनवरून माहिती दिली. तत्काळ जळगावात परतलेल्या राजपूत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरट्यांनी घरातील ३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मणी, ४ ग्रॅमची मुलांची सोन्याची चैन, ९ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, चांदीच्या वाट्या, रेमंड कंपनीचे कापड, गाऊन व रोख ५ हजार रुपये असा एकूण ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले आहे.
शहर पोलिसांनी गोपालसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम