
सोनाळा फाट्याजवळ साखर भरलेला ट्रक उलटला
चालक गंभीर जखमी, वाहतूक ठप्प
जामनेर | प्रतिनिधी – पहूर ते जामनेर रोडवर सोनाळा फाट्याजवळ सोमवारी दुपारी साखर भरलेला ट्रक अचानक उलटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, एमपी 09-0446 क्रमांकाचा ट्रक साखर पोत्यांनी भरून पहूरच्या दिशेने जात होता. याच दरम्यान, सोनाळा फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. या अपघातात वसीम खान मुस्तकीन खान (वय 40, रा. खंडवा, मध्यप्रदेश) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
साखर भरलेला ट्रक रस्त्यावर आडवा पडल्यामुळे पहूर-जामनेर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम