
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांची बदली; राहुल गायकवाड यांची नियुक्ती
जळगाव: जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) निरीक्षक संदीप पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने हे आदेश काढले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पद हे पोलीस अधीक्षकांनंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गेल्या वर्षी किसनराव नजनपाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र अमली पदार्थांच्या एका प्रकरणानंतर त्यांची बदली झाली. त्यानंतर संदीप पाटील यांना या पदाची जबाबदारी मिळाली होती.
आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी संदीप पाटील यांच्यावर एका महिलेचे शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या गंभीर आरोपानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ निर्णय घेत पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आणि त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. यामुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम