स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी हिंदू महासभेचा निर्धार; समविचारी पक्षांशी युतीचे संकेत

बातमी शेअर करा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी हिंदू महासभेचा निर्धार; समविचारी पक्षांशी युतीचे संकेत

पुणे (प्रतिनिधी)“राजकारण गढूळ आणि दिशाहीन झाले असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी नैतिकतेचे राजकारण आवश्यक आहे. हिंदू महासभा समविचारी पक्षांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे,” असे स्पष्ट मत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. दिनेश भोगले यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. भोगले बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस, उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, प्रमुख कार्यवाह महेश सावंत पटेल, हरिश शेलार, राजू तोरसकर, श्रीमती तिलोत्तमा खानविलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. भोगले म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुका होत नसल्यामागे सत्ताधारी भाजपचा राजकीय हेतू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने वेळ मागितली असली, तरी भाजपला मतदारांचा कल प्रतिकूल असल्याने निवडणुका लांबविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मुंबईसह अन्य महानगरपालिकांमध्ये भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असून, संविधानाच्या मुलभूत तत्वांची पायमल्ली होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. निवडणुकांपूर्वी आश्वासने आणि पोकळ वक्तव्ये करणाऱ्या प्रस्थापित पक्षांवर टीका करताना, त्यांनी स्पष्ट केले की, “हे पक्ष केवळ सत्ता मिळविण्याकरता लोकांची दिशाभूल करत आहेत.”

मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ठोस धोरणांची गरज

श्री. भोगले यांनी पुढे सांगितले की, “मराठी भाषा, मराठी माणूस आणि अस्मिता हे निवडणुकांपुरते मुद्दे नसून, त्यासाठी दीर्घकालीन आणि ठोस धोरणांची आवश्यकता आहे. मराठी शाळा बंद पडत असताना, राज्य सरकार शिक्षकांच्या भरतीत ढिसाळपणा करत आहे, हे चिंताजनक आहे.”

हिंदू महासभेचा वचननामा लवकरच

मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांतील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या नागरी समस्या, महिलांची सुरक्षितता, स्वयंपर रोजगाराची गरज, रस्त्यांवरील खड्डे, खेळासाठी आवश्यक मैदानांची वानवा, वीज दरावरील नियंत्रण, वैद्यकीय सुविधा, खेड्यांमधील उद्योगांचे स्थलांतर अशा विविध मुद्यांवर हिंदू महासभा कटिबद्ध आहे.

“या सर्व समस्यांसाठी आम्ही एक ठोस वचननामा तयार करत असून, लवकरच समविचारी पक्षांशी चर्चा करून तो जाहीर करू,” अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम