स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्सतर्फे तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण

बातमी शेअर करा...

स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्सतर्फे तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण

ठाणे प्रतिनिधी – शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनूप-दापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा आणि आरोग्यदायी शालेय वातावरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आज, दि. ११ ऑक्टोबर, २०२५ रोजी रोटरी क्लब हिल्स, ठाणे आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जिल्हा परिषद शाळांमधील नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालय व स्वच्छतागृहांचे लोकार्पण सोहळे संपन्न झाले.

जिल्हा परिषद शाळा उठावा, जिल्हा परिषद शाळा बोंडारपाडा, जिल्हा परिषद शाळा मेंगाळपाडा या तीन शाळांमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता ही स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टपूर्तीकडे महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

या लोकार्पण सोहळ्याला गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तसेच रोटरी क्लब हिल्स ठाणेचे अध्यक्ष समिर लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लबने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून, जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या सहकार्याने हे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

या उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, आरोग्यविषयक जागरूकता आणि स्वच्छ वातावरणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण होणार आहे. हा उपक्रम “स्वच्छ शाळा, आरोग्यदायी भविष्य” या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम