
स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्नांची जोड दिली तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश -अशोक नखाते
विद्यापिठात स्पर्धा परीक्षा जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्नांची जोड दिली तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश -अशोक नखाते
विद्यापिठात स्पर्धा परीक्षा जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्नांची जोड दिली तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रयत्न करावेत असे आवाहन जळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना श्री. नखाते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंद्राचे संचालक प्रा. अजय सुरवाडे, विद्यार्थी विकास संचालक डॅा. जयेंद्र लेकुरवाळे यांची मंचाावर उपस्थिती होती.
श्री. नखाते यांनी ग्रामसेवक ते अतिरिक्त पोलीस अधीक्षकांपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगतांना आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच ही जिद्द उलगडून दाखविली. ध्येय, आत्मविश्वास, दृष्टीकोन आणि प्रयत्नांची जोड असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, शिक्षणातूनच भविष्य घडणार असल्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. रोजगार हा आवश्यक असून गुगलवर डाउनलोड करून भाकरी मिळणार नाही. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन आयुष्यात करायचे असेल तर शिक्षण गरजेचे आहे. जिद्द, व्यक्तीमत्व, दृष्टीकोन आणि समज या गोष्टी शिक्षणामुळे मिळतात. माणूस संवेदनशील आणि जबाबदार होतो. आज नोकरीची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. कंपन्यांमध्ये कौशल्य आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थी वळला आहे. माऋ आपल्यातील क्षमता ओळखून या परीक्षा द्याव्यात आणि मेहनत घ्यावी असे आवाहन प्रा. माहेश्वरी यांनी केले. प्रारंभी प्रा. अजय सुरवाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आभार मानले. दिवसभर चालेल्या या कार्यशाळेत आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपील पवार, जळगावचे डॉ. जयदीप पाटील, प्रिती तारकस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा जवळपास २०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम