स्वातंत्र्य दिनीही न्यायाची याचना: जळगाव पीपल्स बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अन्नत्याग उपोषण सुरूच

बातमी शेअर करा...

स्वातंत्र्य दिनीही न्यायाची याचना: जळगाव पीपल्स बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अन्नत्याग उपोषण सुरूच

 

 

पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांचा मोठा पाठिंबा

 

चोपडा (प्रतिनिधी): दी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सागर ओतारी यांनी सुरू केलेले आमरण अन्नत्याग उपोषण सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशीही नागरिकांना न्यायासाठी उपोषणास बसावे लागणे, हे पोलिस प्रशासनासाठी नामुष्कीचे ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार चोपडा शहर पोलीस स्टेशनसमोर १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या या उपोषणाला उपोषणकर्ते सागर ओतारी यांनी ‘न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळूनही गुन्हा दाखल नाही या प्रकरणात २६ एप्रिल २०२५ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नाही. बँकेने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, २४ जून २०२५ रोजी न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याने पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. यामुळे बँकेला पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेला न्यायापासून वंचित ठेवल्याचा निषेध व्यक्त होत आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष या प्रकरणातील तपास अधिकारी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:

  • संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी.
  • या प्रकरणी अन्यायाला पाठबळ देणाऱ्या आणि बँकेला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व जबाबदारांची चौकशी करावी.

स्वातंत्र्य दिनीही सुरू असलेल्या या उपोषणामुळे पोलिस प्रशासनावर जनतेचा रोष वाढत आहे. ‘न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील’, असा ठाम संदेश या उपोषणातून जनतेने दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम