
हतनूर धरणाचे ६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; तापी नदीच्या पातळीत वाढ
हतनूर धरणाचे ६ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; तापी नदीच्या पातळीत वाढ
जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.
जूनच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे धरणाचे १२ दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आवक कमी झाल्याने फक्त चार दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळपर्यंत केवळ चार दरवाजांतून विसर्ग सुरू असतानाच, बुधवारी सकाळी पाण्याची आवक वाढल्याने आणखी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे सध्या एकूण ६ दरवाजांतून विसर्ग सुरू आहे.
या विसर्गामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या हतनूर धरणातून तब्बल ६३,५७८ क्सूसेकने तापी नदीत विसर्ग सुरू आहे. धरणाची एकूण पाणीपातळी २१०.४५ मीटर असून, साठ्याची टक्केवारी ५४.६४ आहे, अशी माहिती शाखाधिकारी भावेश चौधरी यांनी दिली.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रातील गेल्या २४ तासातील पावसाच्या नोंदीनुसार बऱ्हाणपूरला ३.४ मिमी, देढतलाईला ५.४ मिमी, टेक्साला ३१.८ मिमी, एरडीत ३ मिमी, गोपालखेड्यात ४.२ मिमी, चिखलदऱ्यात १३.८ मिमी, लखपुरीत १२.८ मिमी, लोहाऱ्यात २१.२ मिमी तर अकोल्यात १५.४ मिमी असा एकूण १११ मिमी पाऊस झाला आहे.
पाण्याच्या वाढत्या आवकेमुळे हतनूर धरणानंतर शेळगाव बॅरेजचेही तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. तेथून ४,५८१ क्सूसेकने तापी नदीत विसर्ग सुरू आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास हतनूर आणि शेळगाव येथील आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम